Thursday, July 17, 2008

साधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगायचं...

साधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगायचं...
साधं सोपं आयुष्य साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं रडावंसं वाटलं तर रडायचं

जसं बोलतो तसं नेहमी वागायला थोडंच हवं
प्रत्येक वागण्याचं कारण सांगायला थोडंच हवं

ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!
मनात जे जे येतं ते ते करून बघितलं पाहिजे आपण
जसं जगावं वाटतं तसंच जगून बघितलं पाहिजे आपण
करावंसं वाटेल ते करायचं जगावंसं वाटेल तसं जगायचं...

आपला दिवस होतो जेंव्हा जाग आपल्याला येते
आपली रात्र होते जेंव्हा झोप आपल्याला येते
झोप आली की झोपायचं जाग आली की उठायचं!

पिठलं भाकरी मजेत खायची जशी पक्वान्नं पानात
आपल्या घरात असं वावरायचं जसा सिंह रानात!

आपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं आपणच कौतुक करायचं
असेलही चंद्र मोठा त्याचं कौतुक कशाला एवढं
जगात दुसरं चांदणं नाही आपल्या हसण्या एवढं!
आपणच आपलं चांदणं बनून घरभर शिंपत रहायचं
साधं सोपं आयुष्य साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं रडावंसं वाटलं तर रडायचं


-- प्रसाद शिरगांवकर

2 comments:

satyajit said...

ही प्रसाद शिरगांवकरांची कविता आहे, कृपया कविच नाव नमुद करा.

Innovative said...

छान कविता लिहीली आहे