Thursday, September 3, 2009

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं ..


मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !

तुमचं दु:ख खरं आहे,
कळतं मला,
शपथ सांगतो, तुमच्याइतकंच
छळतं मला;
पण आज माझ्यासाठी
सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन
अंगणभर पसरायचं !

सूर तर आहेतच : आपण फक्त झुलायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
 आयुष्यात काय केवळ
काटेरी डंख आहेत ?
डोळे उघडून पहा तरी :
प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत !
हिरव्या रानात,
पिवळ्या उन्हात
जीव उधळून भुलायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
प्रत्येकाच्या मनात एक
गोड गोड गुपीत असतं,
दरवळणारं अत्तर जसं
इवल्याश्या कुपीत असतं !

आतून आतून फुलत फुलत
विश्वासाने चालायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
आपण असतो आपली धून,
गात रहा;
आपण असतो आपला पाऊस,
न्हात रहा !
झुळझुळणार्या झर्याला
मनापासून ताल द्या;
मुका घ्यायला फूल आलं
त्याला आपले गाल द्या !
इवल्या इवल्या थेंबावर
सगळं आभाळ तोलायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
----------- मंगेश पाडगांवकर

5 comments:

HAREKRISHNAJI said...

सुरेख

Devendra Yadav said...

http://www.youtube.com/watch?v=1ZADwvQ0tQI

Ramchandra D. Gore said...

Khupach chan ahe mala awadle

Radha said...

hi.. i loved your blog!!
you seem to know marathi well..
can you do me a favour please? can you post or mail the meaning of the song ayushywar bolu kahi? i saw that you wrote the lyrics for that song.. but i didnt understand the meaning behind it..
thanks so much!

Radha said...

hey.. awesome blog!!
can you do me a favour please?
can u explain the meaning of the song ayushyawar bolu kahi? the song has a very deep meaning, and you seem to know marathi well..!